Skip to main content

....नीच माणूस - श्री रामराजे शिंदे

मी स्वत - पासून सुरूवात करतो.
राजकारण्यावर वारंवार टिका करण्याचा जन्मसिद्ध अधिकार लाभलेला मी पत्रकार. पत्रकारितेत मी काय करतोय, हे मी जाणून घ्यायला हवं. मला नुकतेच एक मंत्री महोदय भेटले. सध्याच्या पत्रकारितेवर बोलताना ते म्हणाले, ''तुम्ही मीडियावाले... आठवी-नववी शिकलेली पोरं. एक दंडुका हातात घेता आणि आम्हाला जाब विचारता. तुमच्याकडे किती नाॅलेज आहे हे अगोदर तपासता का ?'' त्यांचा हा प्रश्न बरोबर आहे. माहिती नसतानाही अर्धे हळकुंडाने पिवळे झालेले पत्रकार, ४० वर्षे राजकारणात घालवलेल्या नेत्याच्या विरोधात बातमी देताना नक्कीच आपली पण तेवढी पात्रता आहे का, हे तपासायला हवं.
पाॅलिटीकल रिपोर्टरचं नेमके काय काम असतं. अनेकजण राजकीय बातमीदारी करतात. म्हणजे नेमकं काय करतात ? राजकारण्यांच्या पुढे मागे फिरणं.. राजकीय नेत्यांसोबत फोटो काढणं... किंवा हांजी हांजी म्हणत एखाद्या विशिष्ट विचारधारेच्या दावनीला बांधून घेणं. काय असते राजकीय पत्रकारिता. आपण खूप काहीतरी वेगळ्या ग्रहावरचे आहोत, असा जर कोणात्या पत्रकाराचा समज असेल तर त्यांनी एकदा दिल्लीच्या जंतर मंतर इथं जाऊन एक फेरफटका मारून यावं. तिथे राजकीय किस्से रंगवता येत नाही की एकमेकांच्या उकाळ्या पाकाळ्याही काढता येत नाहीत... कारण गर्मीच ऐवढी असते की पाय थांबत नाही. घामानं दोन तीन वेळा आंघोळ तर ठरलेलीच असते. त्यात कर्णकर्कश आवाज. दोन पावलागणिक कानांवर पडणारा गोंगाट मस्तक तापवतो. ठरलेली बातमी कव्हर करण्याकडे जेंव्हा पावले वळतात तेंव्हा जंतर मंतरच्या त्या रस्त्यावरून जाताना प्रत्येक नेत्याचा बेंबीच्या देठापासून निघणारा आवाज एका कानातून ऐकून दुस-या कानातून सोडण्यातच आपलं भलं असल्याचं जाणवतं. पोटतिडकीन माईक वर ओरडणारी ही वेडी माणसं कुठून येतात.? असा प्रश्न तेंव्हा मनात डोकावून जातो. आमच्या पोटात भूकेनं आग लागलेली असते आणि तिथे ४६ डिग्री तापमानात प्रत्येक कोप-यात एखाद्या संघटनेचा लीडर भाषण ठोकत असतो. 'वन रॅक वन पेन्शन' साठी लढणारे जवान असो की आसाराम बापू च्या सुटकेसाठी रात्रं दिवस फोटो समोर भजन करणा-या महिला भक्त असो.. समाजाच्या वेगवेगळ्या रूपाचं दर्शन जंतर मंतरवर होतं. यातच आणखी एका आंदोलनाची भर. तामिळनाडू चे शेतकरी मागील ४३ दिवसापासून कर्जमाफी साठी कपडे काढून आंदोलनाला बसले. आत्महत्या केलेल्या शेतक-यांची हाडे आणि कवटी समोर मांडून आंदोलन सुरू आहे. विष्टा खाण्यापासून ते उंदराचे भोजन करण्यापर्यंत सगळे प्रयोग त्यांना केले. पण मोदी सरकारवर काही एक परिणाम झाला नाही.
.
ते आंदोलन कव्हर करायला निघालो. तेवढ्यात कळालं महाराष्ट्राच्या शेतक-यांचं आंदोलन जंतर मंतरवर झालंय. कॅमेरामनला म्हणालो जाऊन येऊ एकदा. बुधवारचा दिवस इतर दिवसांसारखाच असेल असं वाटलं होतं. पण घडलं वेगळंच. समोर स्टेज उभं होतं. स्टेजच्या समोर बटाटे पडले होते. मला कळालं हे शेतक-यांचे आंदोलन आहे. पण, स्टेजवर टोपी घातलेली काही मुलं दिसली. मला एकानं सांगितलं, महाराष्ट्रात आत्महत्या केलेल्या शेतक-यांची मुलं आहेत ती. आंदोलनात सहभाग होण्यासाठी आली आहेत. मी जवळ गेलो. या मुलांना शेतकरी आत्महत्या म्हणजे काय, हा विषय माहित नव्हता. तिथे दोन चेहरे दिसले. काही लहान मुलं निरागसपणे शांत बसली होती तर काही सातवीतली मुलं धीरगंभीर चेहरा करून सगळं ऐकत होती. त्यांच्याजवळ गेलो. अमिष नावाच्या जेमतेम पाच वर्षाच्या मुलाला विचारलं. भूक लागली का ? ते बाळ म्हणालं, बाबा भेटत नाहीत. मला खाऊ आणून देत नाहीत. मला खाऊ आणून देशील का ? मी त्याला जवळ घेतलं. तिथल्या स्टाफ ला म्हणालो, ती फ्रुटी द्या. फ्रुटी त्याला दिली.
मरण काय असतं या लहानग्यांना काय माहित. आत्महत्या करणं सोपं असतं का ? ऐवढ्या गोड पोराला अंथरूणात सोडून बाप गळाला फास लावतो. आयुष्य संपवतो. तिथं फक्त त्याचं आयुष्य संपत नाही तर त्याच्या लेकराचं भवितव्यही अंधारात जातं. त्या घोळक्यात बसलेल्या नववीच्या एका मुलाला विचारलं तुझे बाबा गेल्यावर तू शिक्षण कसं केलं? त्याने सांगितलं, बाबा गेल्यावर तर माझ्या आईकडे लोकांनी वेगळ्या नजरेनं बघायला सुरू केलं. गावात राहणं अवघड झालं. मग नातेवाईकांनी मदत केली आणि गावाबाहेर पडलो. त्याला विचारलं तुला काय बनायचंय, तो म्हणाला, शेतीमध्ये संशोधन करायचंय. शास्त्रज्ञ बनायचंय. शेतीतील उत्पन्न वाढवायचंय. माझ्या बाबानं जे केलं ते पुन्हा कुणाच्या वाटयाला यायला नको.
दुस-या एका मुलीला तर आयपीएस अधिकारी व्हायचंय. तिचे आई वडील शेतात काम करायचे. तेंव्हा मालक आईवडीलांना मारायचा. माझे आई बाबा नाहीत पण असं कोणाच्या घरी व्हायला नको. म्हणून पोलिस बनायचयं. तर सहा महिन्यापूर्वीच एका मुलीचे बाबा गेले. तिला विचारलं तर, टिचर बनायचं म्हणाली. का तर मुलांनी शेती नको तर नौकरी करावी. कारण शेती केली तर बाबा सारखं जीव द्यावं लागेल.
आत्महत्या केलेल्या शेतक-यांची ही लहानगी अनाथ मुलं सरकारच्या तोंडावर चपराक आहेत. गायीचं रक्षण करण्यासाठी गौरक्षक दल निर्माण करणारं हे भामटं सरकार गायीला आयुष्यभर सांभाळणा-या जिवंत शेतक-याचं रक्षण का करू शकत नाही ? का आत्महत्या थांबवता येत नाही ? त्यांना मदत का पोहोचत नाही ? केवळ पत्रकार असल्यामुळे मी हे प्रश्न विचारत नाही. तर तुम्ही कोणत्या गोष्टीला महत्त्व देता हे मला समजून घ्यायचंय. मला सांगा समजावून विदर्भ-मराठवाड्याच्या शेतक-यांना दिलेले पॅकेजचे आकडे ढगात गायब झाले का ?
या मुलांकडे पाहून माझी मला लाज वाटली.
माझी पत्रकारिता आज-उद्या संपेल. पण माणूस म्हणून मला माझी जबाबदारी नाकारता येणार नाही.
मला त्या सन्माननीय मंत्री महोदयांना सांगायचंय,
पत्रकारिता करताना काही नववी शिकलेल्या पत्रकारांची पात्रता नसेलही पण संवेदना तर जिवंत असायला पाहीजेत ना. शेतकरी गळफास लावून आत्महत्या करतोय, विहीरीत उडी घेऊन जीव देतोय, हे समजण्यासाठी कोणत्या विद्यापीठाची डिग्री घ्यावी लागते ते तरी सांगा.
निसर्गानं, राजकारण्यानं, सावकारानं आणि रूढी-परंपरांनी या मुलांच्या आई बाबांना हिरावून घेतलंय. त्यांना त्यांचं विश्व परत करायचंय.
या लहानग्यांचे आयुष्य घडवण्यात माझा हातभार लागणार नसेल तर पत्रकार म्हणून मी कितीही यश मिळवलं तरी 'माणूस' म्हणून मी नीच असेन.

रामराजे शिंदे, झी मीडिया, दिल्ली.

Comments

Popular posts from this blog

......पञकारीता सुरक्षित राहलेली नाही - जेष्ठ पञकार जोशी

देशात , महाराष्ट्रात पत्रकार क्षेत्र सुरक्षित राहिलेले नाही.पत्रकारांची नोकरीच धोक्यात आली आहे. एका झटक्यात त्यांना नोकरीवरून् काढले जात आहे.इतकी भयावह स्थिती या क्षेत्राची झाली आहे. देशातील  पत्रकारांचे व कर्मचारी वर्गांचे  वेतन निश्चित करण्यासाठी मजिठीया आयोगाची नियुक्ती करण्यात आली होती.या  आयोगाचा  आपला सादर केला.पण याप्रमाणे वेतन देण्यास वृत्तपत्र मालकांनी संघटीतपणे  नकार दिला. ते सर्वोच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने  या आयोगाने केलेल्या शिफारशी प्रमाणे वेतन देण्याचा निकाल दिला. तरी वृत्तपत्र मालक हे मान्य करावयास तयार नाहीत. इतकेच त्यांनी नव्हे कंत्राटी पत्रकार व संपादक  नियुक्त करण्याचा सपाटा लावला. पण याही पत्रकारांना मजिठीया आयोगा प्रमाणे वेतन देण्याचे निर्देश न्यायालयाने  दिले.  त्यामुळे तर  वृत्तपत्र मालक अधिक बिथरले आहेत .त्यांनी तर आता कामचुकार असल्याचा ठपका  तसेच नोटबंदीचा फटका  बहाणा करत पत्रकार कर्मचाऱ्यावर कुऱ्हाड  चालवत आहेत. अनेक जणांचा बदलीच्या  माध्यमातून छळ केला जात आहे.जेणे करून त्या पत...

कशी असावी पञकारीता ........

समाजातील राजकीय,प्रशासकीय  क्षेत्रातील लोकांनो श्रमजीवी,ग्रामीण पत्रकारिता काय असते हे तुम्हाला ज्ञात आहे का? कोण असतो पत्रकार? कशी असते पत्रकारिता? थोडे कान इकडे करा ऐका,       घरची भाकरी खाऊन जगाचा आरसा असतो पत्रकार??       घरदारावर तुळशीपत्र ठेवून,घरचे पैसे खर्चून,गावातील,परिसरातील प्रश्न त्याला तडीस नेण्यासाठी धडपडतो तो पत्रकार?    अहो तुम्हाला वाटेल पगार असेल अहो कसला पगार आम्हाला साधे मानधन ही नसते,असले तर अगदी थोडके,बातमीच्या शोध,लेखन,वेळ,व बातमी पाठविणे,ती छापून येईपर्यंत वाट बघणे,अन दुसर्या बातमीच्या शोधला लागणे ही पत्रकारिता असते, हे समजून घ्या,     कुठलाही आर्थिक आधार नसतांना बातमीला आपला श्वास समजतो पत्रकार,      बातमी आल्यावर तिचे परिणाम भोगतो पत्रकार?      लोकांच्या दूषणे,पुढारयांच्या नको त्या प्रश्नाला भिडतो पत्रकार, हे सर्व समाजासाठी भोगतो पत्रकार. हो हे लिहितो ना मी आहे तसाच, जो बातमीसाठी आयुष्य भर राबतोय,     समाजाला किती कळतो पत्रकार?????    अरे विच...

पञकारीता धंदा झाला??

आजच्या भारतीय लोकशाहीत विधी पालीका , न्यायपालीका व कार्यपालीका या तिन्ही स्तंभा शिवाय चौथा स्तंभ म्हणून पञकारीतेचा उल्लेख केला जातो . पञकारीतेला एवढे महत्वाचे स्थान देण्यात आले आहेकी समाजात घडत असलेल्या घडामोडीचे वास्तव्य समाजातील लोकांन समोर आणून त्यातील उणीव , उजागार करण्याचे महत्वपूर्ण कार्य महाराष्ट्रातील पञकारांनी करावे अशी अपेक्षा सर्वांचीच असते .  याच लोकशाहीच्या माध्यमातून इंग्रजीकाळात   लोकमान्य टिळक , बाळ जांभेकर , पुथ्वीगीर गोसावि यांनी साप्ताहिक वृत्तपञाच्या माध्यमातून समाजाला आरसा बणविण्याचे महत्वपुर्ण काम केले .  मागील भुतकाळात वृत्तपञ चालकांनी वृत्तपञाच्या माध्यमातून भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले मात्र आजच्या धनदांडग्या युगात काही वृत्तपञ चालकांनी याच माध्यमातून त्या स्वातंत्र्यला सुराज्य करण्यासाठी याच साप्ताहिक , दैनिक व इलेक्ट्रानिक माध्यमाचा वापर केला नाही तर स्वातंत्र्याच्या स्वार्थासाठी राजकीय दलदल करून टाकला आहे.  आज पञकारीता परमोधर्म न राहता परमोधंदा बनला आहे. आज ग्रामीण पञकारांना थोड्या मानधनात वर्षागणपती वापरून त्यांना वेठबिगाराची व...