कोणा पत्रकाराला ठार मारण्यात आले की त्या पुढील ७२ तास मिडियातल्या "चमको पत्रकारांना" निषेध व्यक्त करायची आयती संधी मिळते आणि त्या संधीचा हे "चमको पत्रकार" पुरेपुर वापर करून घेतात. कटू आहे पण हेच सत्य आहे. एरवी एखाद्या पत्रकाराला मारहाण झाली, त्याच्यावर अन्याय झाला की तो ज्या संस्थेत कार्यरत आहे ती वृत्तसंस्था सोडून तर इतर वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे, वृत्तसंस्था त्याची जाणूनबूजून दखल घेत नाहीत. त्याबद्दल बातमी दाखवत नाहीत. राजकीय क्षेत्रापेक्षा बरबटलयं हे क्षेत्र.. वृत्तसंस्थाच्ये टीआरपी च्या खेळात सामान्य पत्रकारांची अक्षरशः ससेहोलपट होत आहे. कोणा राजकीय व्यक्तीवर हल्ला वगैरे झाला तर सर्व राजकारणी पक्षभेद विसरून एकत्र येतात.. एकीचे बळ त्यांना चांगलेच माहित आहे.परंतु जगाला शाळा शिकविणार्या पत्रकारांना हे कळूनही वळत नाही हेच दुर्दैव आहे. सामान्य बातमीदाराने एखादी महत्वाची बातमी पुराव्यानिशी पाठवली आणि नेमकं त्याच वेळी एखाद्या सेलिब्रेटीला साधी शिंक जरी आली की ती "BREAKING NEWS" होते आणि टीआरपीच्या हव्यासासाठी त्या बातमीदाराने जीवावर खेळून तयार केलेली "बातमी" सरळसरळ दाबली जाते. संबधित बातमीदार मात्र शत्रूत्व पत्करून बसतो.
"जो बिकता है; वही दिखता है" अशी परिस्थिती मिडियाची आहे. एखाद्या होतकरू उमेदवाराच्या बातम्या दाबून त्याला निष्प्रभ करून त्याचे पत्रकारीता क्षेत्रातील मुल्य कमी करणे हा तर सेलिब्रेटी वरिष्ठ पत्रकारांचा आवडता खेळ बनला आहे. मिडिया लोकशाहीचा चौथा खांब आहे हे मोठ्या अभिमानाने मिडियावाले ओरडत असतात परंतु वास्तवात मिडियात इतकी हुकूमशाही आणि सरंजामदारी आहे की लोकशाहीचा येथे काही संबंधच नाही.
"सोशल मिडिया" प्रभावी ठरणार हे ओळखून अनेक नावाजलेल्या आणि खर्या पत्रकारांनी बाजारू मिडिया सोडून ब्लाॅग, फेसबूक, वेबपेज, आदी माध्यमातून जातीवंत पत्रकारीता सुरू केली. अनेक पत्रकारांनी लाखो वाचकांचा टप्पा ओलांडला तो केवळ सच्ची पत्रकारिता करून केलेल्या लिखाणामुळे.
आज "मिडिया हाऊस" म्हणजे चलनी नाणे आहे हे ओळखून अनेकजण या माध्यमातून केवळ स्वतःचे उखळ पांढरे करून घेत आहेत. व्रतस्थ पत्रकारिता या प्रकाराशी त्यांचा काडीमात्र संबंध नाही. पूर्वी सुपारी देऊन गॅन्गस्टर च्या माध्यमातून प्रतिस्पर्ध्याला संपवले जायचे त्याच प्रमाणे हल्ली सुपारी घेऊन एखाद्याला आयुष्यातून उठविण्यासाठी अनेकदा मिडियाचा वापर होत आहे. इतकी खालावली गेली आहेत मिडिया हाऊसेस..
काही अपवादात्मक मिडिया वगळता बाकी सगळ्या ठिकाणी हिच स्थिती आहे. अनेक पत्रकारांचे उदरनिर्वाहाचे पत्रकारिता हे एकमेव साधन असल्यामुळे "सहन" करण्यापलिकडे त्यांच्या हातात काहीही नाही. याचा व्यवस्थित फायदा काही धेंडं करून घेत आहेत.
अनेकवर्ष रेंगाळलेला पत्रकार संरक्षण कायदा म्हणजे पत्रकारिता क्षेत्राचे नाकर्तेपण असे कोणालाच वाटत नाही. काही अपवाद सोडले तर इथे प्रत्येकाला सेलिब्रेटी बनायचय.. पण तेरड्याचे दिवस तीन अशी सेलिब्रेटिजची अवस्था आहे हे वास्तव स्विकारायला ते तयार नाहीत.
निरपेक्ष पत्रकारितेचा ठसा उमटविण्यास आपण कुठेतरी कमी पडतोय ही खंत न वाटणे म्हणजे पत्रकारितेचा बळी देण्यासारखेच आहे.
कोणा पत्रकाराचा खून झाला की अनेक रूदाल्या छात्या बडवून निव्वळ चमकोगीरी करतात. "प्रसिद्धी" रूपी बिदागी मिळाली की पुढच्या खूनापर्यंत गप्प बसतात.. पुढचा खून झाला की पून्हा तमाशा सूरू...
फसव्या "BREAKING NEWS" च्या जमान्यात पत्रकार खरोखरचे "BREAK" होत आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी खरोखरच काही करायची इच्छाच नसेल तर खरंच बंद करा हे नाटकी निषेध आणि चमकोगीरी.
या लेखाचे लेखक..
श्री पुष्कर रवींद्रकुमार पुराणिक
Comments